मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जेपी नड्डा हे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जर जेपी नड्डा आले तर मी त्यांना भेटणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर यांनी थेट नड्डा यांना भेटण्याची तयारी दाखवल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना जोरदार उधाण आलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यावेळी हे विधान केलं. जेपी नड्डा हे माझ्या राजगृहावर येणार की नाही माहीत नाही. मला तसा त्यांच्याकडून कोणताही निरोप आलेला नाही. ते आले तर कुटुंबप्रमुख म्हणून मी त्यांना भेटणार आहे. जेपी नड्डा आले तर त्यांचा उचित सन्मान करावा, असं मी कुटुंबाला सांगून ठेवलं आहे. राजगृहावर येणाऱ्यांचा आम्ही नेहमी योग्य सन्मान करतो, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नड्डा आणि आंबेडकर यांची भेट होणार का? झाली तर या भेटीत काय चर्चा होणार? त्यानंतर आंबेडकर काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.