अकोला : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. शिवसेना- उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस -शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे. भारतीय जनता पक्षासोबत जे राहिले आहेत, त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी खासदार संजय राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केल्यानंतर त्यांच्यावर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे.
तसेच अकोल्यात गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने माझ्याविरोधात मुस्लिम उमेदवार दिला. त्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाल्याचं अकोला जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचं मत आहे, यावेळी देखील असंच झालं तर मुस्लिमांचे मत कायम राहील, असं देखील आंबेडकरांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटलांवरून उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.