बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड हे कायम चर्चेत असतात. सातत्याने त्यांच्या विधानांवरून वाद निर्माण होत असतात. आता पुन्हा एकदा आमदार गायकवाड चर्चेत आले आहेत, पण ते वेगळ्या कारणामुळे. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक आणि ट्विटर अकाऊंटवरून तो व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
बुलढाणा शहरात जयस्तंभ चौकात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड आणि इतर ४० आमदारांना व खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. तीच सुरक्षा अजून कायम आहे.
दरम्यान आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे वाहन पोलीस कर्मचारी धुत असल्याचा एक व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हा पोलीस कर्मचारी नेमका कोण आहे, हे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही. परंतु, आमदार संजय गायकवाड यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकीच तो एक असावा, असा अंदाज आहे.
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणींच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? असा संतप्त सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांच्या या वर्तनावर बुलढाणा एसपी सुनील कडासने काय कारवाई करणार? करणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram
“दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . ! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,” अशा शब्दांत माजी आमदार सपकाळ संताप व्यक्त केला आहे.
संजय गायकवाड आणि वाद
एका महिलेची शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली न्यायालयाने 17 फेब्रुवारीला बुलढाण्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि आणखी दोघंविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानंतर पोलिसांनी अखेर 28 फेब्रुवारीला रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आपल्या गळ्यातील हारात वाघाचा दात असल्याचा दावा आणि ती शिकार आपण स्वतः केल्याचा दावा करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांवर वन विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस शर्म करो !
2दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केले होते CM शाळेत पहारा देणार आहेत का ?
SP आरोपीच्या घरी बसणार आहेत का?
याचे उत्तर आज सकाळी मिळाले पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार!
पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा? pic.twitter.com/FnCXaXBaZp
— Harshwardhan Sapkal (@harshsapkal) August 29, 2024
त्यानंतर बदलापूरच्या घटनेवर बोलताना आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का?” असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.