यवतळमाळ : यवतळमाळ जिल्ह्यातील शाळेत एक धक्कादाएक प्रकार समोर आला आहे. शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चॉकलेटमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळून आल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यवतळमाळ जिल्ह्यातील आर्णीच्या गांधीनगर येथील श्रीमद भारती शाळेत हा प्रकार घडला असून या प्रकारामुळे पालकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सरकारने यंदा पहिल्यांदाच शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांदुळ न देता मिलेट न्यूट्रिशन बार रागी, ज्वार, बाजरा, अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येकी २५ असे तिन्ही मिळून प्रती विद्यार्थी ७५ मिलेट बार देण्यात येणार होते. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात उन्हाळ्यात मिलेट बार दिले. तर आता तिसऱ्या टप्प्यात चॉकलेटचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी मोठ्या आनंदात चॉकलेट आपल्या घरी घेऊन गेले. परंतु, यातील काही विद्यार्थ्यांच्या चॉकलेटला बुरशी लागली असल्याचं आढळून आला आहे. इतकेच नाही तर काही चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीनगर येथे राहणाऱ्या इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुजफ्फर इकबाल शेख या विद्यार्थ्याने घरी गेल्यानंतर चॉकलेट खाल्ले. पण हे चॉकलेट मळकट लागत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्याची माहिती आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी इतर चॉकलेट उघडून बघताच त्यामध्ये तांदळाच्या आकाराच्या अळ्या आढळून आल्या. हा सर्व प्रकार पाहून मुजफ्फरच्या वडिलांना मोठा धक्काच बसला. त्यांनी तातडीने शाळा प्रशासनाला यासंदर्भातील माहिती दिली. मात्र, शाळा प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सकस आहाराच्या नावावर शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप पालकवर्गांकडून करण्यात आला आहे. या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.