नागपुर : नागपुरात एका फोटोग्राफरची भरदिवसा घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली आहे. घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेने नागपूर हादरून गेलं आहे. विनय पूनेकर अस मृत व्यक्तीचे नाव आहे. ते जुने प्रेस फोटो असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रेस फोटोग्राफर असलेले विनय पूनेकर हे घरी एकटे असताना अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरी आला. त्या अज्ञाताने सायलेन्सर लावलेल्या पिस्टलने त्यांच्यावर गोळ्या झाडून त्या ठिकाणाहून पळून गेले. पूनेकर यांना प्रेस फोटोग्राफर म्हणून काम सोडून अनेक वर्षे झाले आहेत. दरम्यान त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून त्यांची हत्या झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध शहरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे गुन्हेगारांना कायद्याचा वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.