कळंब (यवतमाळ): रिडिंग कमी दिल्याच्या दोन कामगारांच्या वादात पेट्रोल पंप चालकाने उडी घेतली. तसेच त्यातील एका नोकराला मारहाण करून त्याच्यावर एअर पिस्टल रोखली. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील राळेगाव मार्गावर असलेल्या उमरी फाटा परिसरातील चिंतामणी नायरा पंपावर घडली. घटनेनंतर पेट्रोल पंप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सचिन डहाके (रा. वर्धा) असे आरोपी पंप चालकाचे नाव आहे. सोमवारी सकाळी मयूर गणेश गायधने (२१ वर्षे, रा. आमला) हा कामगार सकाळी नेहमीप्रमाणे कर्तव्यावर आला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्याची सुटी झाली. यावेळी दुसऱ्या पाळीत कर्तव्यावर आलेल्या प्रमोद नामक कामगाराने रिडिंग कमी दिल्याच्या कारणावरून वाद केला. ही बाब लक्षात येताच डहाके याने त्यांच्या वादात उडी घेतली. तसेच मयूरला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने एअर पिस्टल रोखली. घटनेनंतर मयूरने कळंब पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. घटनेची माहिती आमलावासीयांना मिळताच सरपंच विशाल वाघ यांच्यासह गावकरी पोलीस ठाण्यात धडकले. त्यानंतर ठाणेदार दीपमाला भेंडे यांनी पथकासह पेट्रोल पंप गाठून डहाकेला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून एअर पिस्टल जप्त केली.