बुलढाणा : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्याकडून हाताने स्वत:चे पाय धुवून घेतल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहेत. एका गावात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर पटोले यांचे पाय चिखलात भरले असल्याने कार्यकर्त्याने ते धुतले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच काँग्रेसकडून सारवासारव करण्यात येऊ लागली आहे. अशातच नाना पटोले यांचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच, विजय गुरव हे नेमके कोठे कोठे गेले, असा प्रश्ना काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.
दरम्यान एका कार्यकर्त्याने पाय धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर राज्यभरातील अनेक नेत्यांनी नाना पटोलेंसह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. या प्रकारामुळे काँग्रेस चांगलीच बॅक फूटवर गेल्याने नेत्यांकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्यानुसार शेगाव येथील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना यासंबंधी न बोलण्याची नेत्यांनी तंबी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यातच पटोलेंचे पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव हा देखील सकाळपासून नॉट रीचेबल आहे. याबाबत गुरव यांच्या शेगावजवळील कालखेड गावात जाऊन चौकशी केली असता, ते बाहेरगावी गेल्याची माहिती त्यांच्या पत्नी वर्षा गुरव यांनी दिली आहे. त्यामुळे, विजय गुरव हे नेमके कोठे गेले? त्यांचा फोन कशामुळे नॉट रिचेबल आहे? याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.