कोरपना : कोरपना तालुक्यातील शेरज येथील दुचाकीवरून घरी परतणाऱ्या एका शेतमजुराचा अपघात झाला. यात डोक्याला गंभीर इजा होऊन त्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मात्र, कुटुंबावर ओढावलेले दुःख बाजूला सारून शेतमजूर कुटुंबीयांनी मृताचे यकृतासह दोन्ही किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. दुःखाच्या प्रसंगातही या परिवाराने समाजापुढे आदर्श ठेवून अवयवदानातून तिघांना जीवदान दिले आहे.
सुखदेव बोबडे (वय 44) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुखदेव हा दुचाकीने घरी येत होता. त्यावेळी त्याचा अपघात झाला. यामध्ये त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, सुखदेवचे शरीर उपचाराला दाद देत नसल्याने दिसून आले.
विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्याचा मेंदू पेशी मृत झाल्याने आचार्य विनोबा भावे रुग्णालयातील डॉक्टरांनी अवयवदानासंदर्भात समुपदेशन केले. यावेळी दुःख बाजूला ठेवून पत्नी पौर्णिमासह कुटुंबीयांनी एक आदर्श निर्णय घेतला.
ग्रीन कॉरिडोरमधून किडनीचा प्रवास
वर्धा जिल्ह्यातील सांवगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातून तर नागपूरच्या केअर हॉस्पिटलपर्यंत काही वेळातच ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक थांबवण्यात आली आणि किडनी गरजू व्यक्तीला देण्यात आली.