गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीमध्ये नाव उलटल्याने सहा महिला बेपत्ता झाल्या आहेत. या महिलांचा सकाळी 11 वाजल्यापासून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. पण, यामध्ये अद्याप बचाव पथकाला यश आले नाही. येथील स्थानिकांच्या मते, सहा महिलांचा बुडून मृत्यू शक्यता आहे. नदीमध्ये सहा महिला पडल्याची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. चामोर्शी तालुक्यातील गणपूरलगत (रै.) वाहणाऱ्या वैनगंगा नदीत ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिला मिरची तोडणीला निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांची नाव उलटली. त्यानंतर नावाडी पोहून पाण्याबाहेर येत त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला त्यात अपयश आले. एका महिलेचा मृतदेह मिळाला आहे. अजूनही पाच महिलांचा शोधण्याचे काम सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याशिवाय ज्या ठिकाणी नाव बुडाली त्या नदी किनाऱ्यावर गावकऱ्यांनी गर्दी केली आहे. पोलिसांकडून बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. 4 तासानंतरही शोधकार्य सुरुच आहे, पण अद्याप यश मिळाले नाही.