अमरावती : विविध क्षेत्रातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असल्याचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. पंजाबराव देशमुख यांचे कृषी क्षेत्रात फार मोठे नाव आहे. खासदार शरद पवार यांचेही मोठे नाव आहे. डॉ. पंजाबराव देशमुखांच्या नावाने पवार यांना पुरस्कार देण्यात आल्याने आता या पुरस्काराने आणखी मोठी उंची गाठली आहे. पण, शरद पवार यांच्या उंचीची माणसं दरवर्षी कुठं मिळणार, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने 125 रुपयाचे नाणे जारी केले. त्या नाण्याचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार शिवाजी शिक्षण संस्थेच्यावतीने देण्यात आला. त्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
गडकरी यांनी म्हटले की, पंजाबरावांची तळमळ, व्हिजन ही शरद पवार यांच्याकडे आहे. राजकीय धुळवड कायम सुरू असते. मात्र, या राजकीय धुळवडीत डॉ. पंजाबराव देशमुख, शरद पवार यांच्या सारख्या नेत्यांचे नाव, कार्य सामान्यांच्या कायम लक्षात राहते असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.
आपल्याकडे राजकारणाचा अर्थ दुर्देवाने सत्ताकारण असा करण्यात आला आहे. राजकारण म्हणजे राष्ट्राकारण, समाजकारण, विकासकारण, धर्मनीती आहे. राजकारण हेच समाजकारण आहे, असे समजून कृषी क्षेत्रासाठी, शिक्षण, सांस्कृतिक कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांसाठी आणि त्यातील गुणवत्ताधारकांच्या पाठिशी कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता पाठिशी उभं राहणारे महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणजे शरद पवार असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढले.