बुलडाणा : सध्या लग्न म्हटलं की पैशांची उधळपट्टी, प्रतिष्ठा आणि श्रीमंती दाखवण्याचा इव्हेंटच बनत चालला आहे. मुहूर्त आणि संस्कृती याला मुठमाती देत विवाह सोहळे वेगळ्याच वळणावर जात आहेत. मात्र, या सर्व बाबींना फाटा देत वृक्षारोपण करून नवीन वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याचे काम स्नेहल व घनश्याम या जोडप्याने केले आहे.
बुलडाण्यातील येळगाव येथील रहिवासी सुभाष राजपूत यांची कन्या स्नेहल व उतराद पेठ येथील ह.भ.प. जगन्नाथ इंगळे यांचा मुलगा घनश्याम यांचा विवाह 2 मे रोजी बुलडाणा येथील यशोदा नगर येथे पार पडला. थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने हा आदर्श विवाह पार पडला. स्नेहल व घनश्याम दोघेही उच्चशिक्षित असून, दोघांच्याही घरात आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. वायफळ खर्च न करता साध्या पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले.
त्यांच्या या लग्नाची वरात नाही, बँड किंवा डीजेही नाही. अगदी साध्या पद्धतीने यांचा विवाह सोहळा बुलडाण्यात पार पडला. वृक्षारोपण करुन या दाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात केली. विवाह सोहळे साध्या पद्धतीने व्हावे, अतिरिक्त वेळ आणि पैशांचा अपव्यय होऊ नये हा यामागचा उद्देश. त्यांच्या या विवाहाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.