मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातून एकाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांची भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. नवनीत राणा गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढून जिंकल्या होत्या.
भारतीय जनता पक्षाकडून नवनीत राणा लढणार हे निश्चित होते, परंतु त्यांच्या नावाला शिवसेनाचा मोठा विरोध होता. त्यानंतर भाजपमधील अंतर्गत विरोधाबरोबरच आमदार बच्चू कडूंनीही नवनीत राणांच्या नावाला विरोध दर्शवला होता. जरी महायुतीमधील मित्रपक्षांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला असला, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरुवातीपासून राणा यांना उमेदवारी देण्याविषयी आग्रही होते.
गेल्या पाच वर्षांमध्ये खासदार नवनीत राणा यांनी संसदेत भाजपला पूरक अशी भूमिका घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्याचवेळी भाजप राणा यांना उमेदवारी देणार हे मानले जात होते. परंतु, महायुतीमधील इतर पक्षांचा विरोध आणि जातप्रमाणपत्राचा अडथळा हे नवनीत राणांच्या उमेदवारीत खोडा घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मात्र, आता भाजपने नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून निवडून येणे, नवनीत राणा यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.