नांदेड : नांदेडचे काँग्रेस खासदार नेते वसंत चव्हाण यांचे आज सोमवारी पहाटे तीन वाजता निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं.
वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.
नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून त्यांनी निवडणूक लढवली. तत्कालिन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय महत्वपूर्ण होता.