नागपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असताना २२ लाख गाठी आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून कापूस महामंडळाला हमीभावाने कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात पटोले यांनी म्हटले आहे की, सध्या कापसाचे भाव ६ हजार ५०० ते ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल असून हा भाव ७ हजार १२२ रुपये या हमीभावापेक्षा कमी आहे. बाजारात कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस विकलेला नाही. तसेच सीसीआयकडेही कापूस गाठी पडून आहेत. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात कापस असताना कापसाची आयात केल्याने त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. राज्यात कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहे, कमी भाव, शेती अवजारांवर १२ ते १८ टक्के जीएसटी आणि अवकाळी पाऊस या दुष्टचक्रात कापूस उत्पादक शेतकरी सापडला असून खराब हवामानामुळे यावेळी १९ लाख हेक्टरील कापूस क्षेत्राचे नुकसान झाले आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाईही अद्याप कागदावरच आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना केवळ विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कापूस आयातीवर बंदी घालावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.