अकोला : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अकोल्यात एका कार्यकर्त्याने पाय धुतले. हे प्रकरण कालपासून चांगलंच गाजत आहे. नाना पटोले हे रात्री अकोला जिल्ह्यातील वाडेगावात पोहोचले असता त्यांनी श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यांनतर चिखलातून जात असताना नाना पटोले यांचे चिखलाने पाय भरले. यामुळे नाना पटोले यांचे समर्थक विजय गुरव या कार्यकर्त्याने त्यांच्या पायावर पाणी टाकत पाय धुतले.
दरम्यान, नाना पटोले यांचा पाय धुतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. यावरून विरोधकांकडून पटोलेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु केला. आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून जोरदार टीका करण्यात आली. या सर्व प्रकरणावर पाय धुणारा कार्यकर्ता विजय गुरव हा आता समोर आला असून राजकारण थांबविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
काय म्हणाले विजय गुरव?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सोमवारी अकोला बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथे नियोजित दौरा होता. त्या वेळेस शेगावच्या श्री संत गजानन महाराजांची पालखी ही वाडेगावात मुक्कामी होती. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी पटोले हे चिखलातून त्या ठिकाणी पोहोचले. पालखीचं दर्शन घेतल्यानंतर ते परतत असताना त्यांचे पाय चिखलाने भरले. त्यामुळे मी पाणी आणून पाय धुण्यासाठी त्यांच्या पायावर पाणी टाकले. यात काय गैर आहे?, असा सवाल विजय गुरव यांनी केला आहे.
नाना पटोले माझे दैवत
पुढे बोलताना म्हणाले, नाना पटोले हे माझ्या वडिलांसमान आहेत. ते माझे दैवत आहेत, मी माझ्या दैवतासाठी एक वेळ नाही दहा वेळा त्यांच्या पायावर पाणी टाकेल. त्यामुळे या विषयाला घेऊन आमदार अमोल मिटकरी, आमदार संजय शिरसाट आणि आमदार राम कदम यांच्याकडून नानाभाऊ पटोले यांच्यावर केले जाणारे आरोप थांबवावे. माझे कुटुंबीय आणि माझ्या नावाने आपल्या राजकारणाची पोळी शिकू नये, असे आवाहन देखील विजय गुरव यांनी केले आहे.