Nagpur Water crisis : नागपूर : यंदा राज्यात सर्वदूर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच प्रकल्पांत म्हणावातसा पाणीसाठी नाहीये. सिंचनासह वेगवेगळ्या कारणांसाठी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची पाणीपातळी सप्टेंबरच्या तुलनेत बरीच कमी झाली आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यांच्या आकडेवारीसोबत तुलना केल्यास बहुतेक प्रकल्पांमधील सध्याची पाणीपातळी चिंतेत भर टाकणारी आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीबाणी होणार हे अटळ आहे.
सप्टेंबर महिन्यात नागपूर शहराची तहान भागविणारे नवेगाव खैरी व तोतलाडोह प्रकल्प १०० टक्के भरले होते. शहरालगतच्या वसाहतींची गरज भागविणारे वडगाव धरणही ९८ टक्के भरले होते. सद्यःस्थितीत मात्र नवेगाव खैरी प्रकल्पातील पाणीसाठा ११२ दशलक्ष घनमीटरवर आला असून हे प्रमाण ५१ टक्के आहे. जर आत्ताच पाणी पातळी ५१ टक्के असेल तर संपूर्ण वर्ष पाणी कसे पुरवावे हे खरत डोकेदुखी ठरणार आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात ९२.८९ टक्के जलसाठा होता. तोतलाहोह धरणात ८०.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी हा साठा ९४.६५ टक्के होता. वडगाव धरणातील जलसाठा ८२.७७ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
मोठ्या प्रकल्पांची स्थिती
नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये आजघडीला एकूण ३ हजार ३८९ दलघमी जलसाठा असून एकूण क्षमतेच्या तुलनेत हे प्रमाण ७३.६५ टक्के आहे. गतवर्षी याच सुमारास धरणांमध्ये ८६.२४ टक्के जलसाठा होता. जलसाठा कमी वाटत असला तरी पाण्याची गरज लक्षात घेता तो चांगला असल्याचे मानले जात आहे.
मध्यम प्रकल्पांची स्थिती
मध्यम प्रकल्पांची जलधारण क्षमता ७०८ दलघमी असून ५५५ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.सप्टेंबर महिन्यात ९४.२९ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला जलसाठा आता ७६ टक्क्यांवर आला आहे. गतवर्षी याच कालावधीत ८८.३० टक्के जलसाठा होता.
लघु प्रकल्पांची स्थिती
लघु प्रकल्पांमधील जलसाठ्याचे प्रमाण काहीसे कमी दिसत आहे. या प्रकल्पांमधील जलसाठा सप्टेंबरमध्ये ४५२.७१ दलघमीपर्यंत अर्थात ७६ टक्क्यावर पोहोचला होता. तो आता ३८४ दलघमीवर म्हणजेच ६४ टक्क्यांवर आला आहे.