नागपूर : डोंबिवली एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट झाल्याची बातमी ताजी असताना, आता अशाच एका घटनने नागपूर हादरलं आहे. नागपूरमध्ये एका कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या धामणा येथील चामुंडा बारुद कंपनीत हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीमध्ये काम सुरू असताना अचानक स्फोट झाला. या स्फोटामध्ये अनेक कामगार होरपळले गेल्याची माहिती आहे. या स्फोटात किती कामगार होरपळले गेले आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ रुग्णालयामध्ये नेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख घटनास्थळावर जाण्यासाठी निघाले असल्याचे समजते.