Nagpur Crime News : नागपूर : ओयो हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज ओयो हॉटेल येथे ही खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी बापलेकासह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हॉटेल मालक राकेश चावला (55) आणि आशिष चावला (27) अशी अटक केलेल्या संशयित आरोपी बापलेकांची नावे आहेत. तर अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी ठेवलेल्या व्यवस्थापक धीरज खुळे, गजानन सोनवणे आणि अलोक रैकवार या इतर तिघांची नावे आहेत.
मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील ओयो हॉटेलमधून ही घटना उघडकीस आली. गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.
पैशांची गरज असलेल्या आणि परिस्थिती पुढे हतबल असलेल्या मुलींना पैशांचे आमिष दाखवून हे आरोपी जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते ग्राहकांना अल्पवयीन मुली पुरवीत होते. तसेच ग्राहकांच्या ओळखपत्राची शहानिशा न करता तसेच रजिस्टरमध्ये कुठलीही नोंदणी न करता हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला सोमवारी (दि.13) दुपारच्या दरम्यान ही गुप्त माहिती प्राप्त झाली होती.
दरम्यान पोलीस पेट्रोलिंग असतांना गुन्हे शाखेच्या पथकाने कृष्णकुंज हॉटेलमध्ये धाड टाकली. त्यानंतर घटनास्थळी संशयित आरोपी अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेताना रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. आरोपींवर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच त्यांच्याकडून एकूण 85 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.