नागपूर : नागपुरात एका चोराने तब्बल 111 दुचाकी चोरल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात चोराने नागपूर पोलिसांना चांगलेच कामाला लावले होते. पोलिसांनी जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून त्याला ताब्यात घेतले आहे. ललित भोगे (वय 24 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे. तपासादरम्यान, त्याने 111 दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून नागपुरात वाहन चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोराला ताब्यात घेऊन सर्व दुचाकी जप्त केल्या.
लिलत भोगे हा नागपूर जिल्ह्याच्या आजूबाजूला नऊ जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चोरी करायचा. त्यानंतर चोरीची वाहने दुसऱ्या भागामध्ये विकायचा. ललितने नागपूर, नागपूर ग्रामीण, अमरावती ग्रामीण, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा, गडचिरोली अशा नऊ जिल्ह्यांतून 111 दुचाकी चोरल्या. मात्र, ही संख्या फक्त जप्त केलेल्या दुचाकींची आहे. जी सापडली नाही. त्यांची नोंद यात नाही.
गेले काही महिने नागपूर शहरात सातत्याने वाहन चोरीच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे पोलीस सातत्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत होते. जवळपास 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांजमधून त्यांनी हजारो फुटेज चेक केले. अनेक दिवस तपासल्यानंतर नागपुरातून बेपत्ता होणाऱ्या वाहनांच्या मागे लिलत भोगे हा एकच चोर असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी गोपनीय पद्धतीने लिलत भोगेचा शोध सुरू केला. तेव्हा ललित भोगे कोंढाळी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी ललितला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. तेव्हा त्याने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलीसी खाक्या दाखवताच अमरावती जिल्ह्यातील वरुड या मूळ गावात 20 दुचाकी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वात आधी त्या 20 दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर या सराईत चोराच्या पुढील चौकशीत आणखी 91 दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. खास बाब म्हणजे 24 वर्षांचा हा सराईत चोर फक्त बारावी उत्तीर्ण आहे. मात्र, त्याला ऑटोमोबाईल क्षेत्राची खडा न खडा माहिती आहे. आपल्या याच ज्ञानाच्या आधारावर तो बनावट किल्लीचा वापर करून किंवा दुचाकीचा हँडल तोडून शिथाफीने दुचाकी चोरायचा.