Nagpur Corona Cases: नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १२ कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाधितांचा आकडा २४ वर गेला आहे. परिणामी आरोग्यविभागांसह इतरांच्याही चिंतेत भर पडली आहे. विशेष म्हणजे मोठ्यांसोबतच अल्पवयीन मुलांचाही यात समावेश आहे. त्यांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे शहरात ११ तर ग्रामीणमधून १ पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ५ रुग्ण अल्पवयीन आहेत. या सर्वच रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत.
ज्येष्ठ रुग्णांमध्ये ७० वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, ७३ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरूष, ७१ वर्षीय पुरुष, ३६ वर्षीय महिलेला कोरोनाचे निदान झाले. म्हणजेच ३०-६० वयोगटातील लोकांचा यात अधिक समावेश आहे. नवीन रुग्णांमुळे शहरातील सक्रिय बाधितांची संख्या आता २२ वर पोहचली आहे. तर ग्रामीणलाही २ सक्रिय रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी चार रुग्ण शहरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहेत. परंतु त्यांची प्रकृती स्थिर असून कुणालाही प्राणवायूची गरजही पडली नाही असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अल्पवयीन रुग्णांमध्ये १२ ते १७ वयोगटातील मुले आहेत. यामुळे मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. नव्या बाधितांमध्ये पाच महिला व सहा पुरुष आहेत. २२ रुग्ण अॅक्टीव्ह असून ४ रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.