नागपूर : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका व्यक्तीने कुऱ्हाडीने वार करत पत्नीचा खून केला. ही घटना नागपूरच्या सुरादेवी परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
इंदिरा भारद्वाज (वय 55) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी इंदिरा यांचा मुलगा देवेंद्र (वय 32) याच्या तक्रारीवरून त्याचे वडील गिरीधारी मोतीराम भारद्वाज (वय 65) ला अटक केली आहे. सुरादेवीच्या राणा मंदिराजवळ भारद्वाज कुटुंब वास्तव्यास आहे. गिरीधारी याला इंदिराचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. सकाळी साडेसातच्या सुमारास देवेंद्र दुकानात बसलेला होता. त्याचा एक मित्र घरी खर्रा बनवण्यासाठी आला होता.
इंदिरा दुकानाच्या गेटवरच बसलेली होती. या दरम्यान गिरीधारीने अनैतिक संबंधांचा आरोप करत तिला शिवीगाळ सुरू केली. त्याने इंदिरा आणि देवेंद्र यांना घरून निघून जाण्यास सांगितले. यावरून इंदिरा आणि गिरीधारीत बाचाबाची झाली. यानंतर संतप्त झालेल्या गिरीधारी याने कुऱ्हाडीने वार करत इंदिराचा खून केला.