अमरावती : अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्यानेच स्वत:च्या मुलावर सत्तूरने वार करुन त्याचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना अमरावतीच्या फ्रेजरपुरा ठाण्यांतर्गत येणाऱ्या लुंबिनी नगरात घडली आहे. आज मंगळवारी (दि.3 सप्टेंबर) रोजी दुपारी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल पांडुरंग काकडे (40) असे मृत मुलाचे नाव आहे. तर पांडुरंग रामकृष्ण काकडे (61) असे हत्या करणाऱ्या आरोपी वडिलांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडील पांडुरंग काकडे हे आज मंगळवारी (दि.3 सप्टेंबर) दुपारी कामाहून घरी आल्यानंतर एखाद्या विषयावर दोघांच्यात वाद झाला. त्यावरुन राहुलने बोलत बोलत वडिलांना टोमणा मारला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या वादानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आहे. या खडाजंगीनंतर वडिलांनी राहुलची सत्तुर मारून हत्या केली. राहुलच्या गळ्यावर आणि मानेवर सत्तूरने वार करण्यात आल्याने तो रक्तबंबाळ होऊस घरातच खाली कोसळला. दरम्यान, राहुलला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
आरोपी वडील पांडुरंग काकडे हा सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. तर मुलगा राहुल हा कोणतेही काम करत नसल्यामुळे तो घरीच बसून राहायचा. त्यातूनच त्या दोघांमध्ये टोकाचा वाद झाल्याचे घटनास्थळी असलेले प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने घटनास्थळी भेट देत आरोपी वडिलांना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास फ्रेजरपुरा पोलीस करत आहे.