नागपूर: अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच युवा स्वाभिमान पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्षा नवनीत राणा यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसांपासून खासदार नवनीत राणा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, भाजपच्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या सात याद्यांमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आली नव्हती. दरम्यान बुधवारी आठव्या यादीत त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काही तासांतच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्त करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.