वर्धा : समृद्धी महामार्गावर गो तस्करीचं प्रकरण उघडकीस आले आहे. वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत जात असताना पोलिसांना संशय आला. या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये ५० हून अधिक गाई आढळल्या आहे. हिंगणामध्ये ट्रकचालकासह २ जण ट्रक सोडून पसार झाले आहेत. पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात १ ट्रक रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगाने पळू लागला. यामुळे पोलिसांन जास्त संशय आला. पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला.
अनेक वाहन पाठलाग करत असताना त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडून हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिन्ही लोक पळून गेले. पोलिसांनी त्या ट्रकची पाहणी केली. तेव्हा त्यामध्ये ५० पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक गाईंचा मृत्यू देखील झालेला होता. तर अनेक गाई गंभीररीत्या जखमीही झाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.