अमरावती : काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांना ६ वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. पक्ष विरोधी कारवाई केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारवाई केली आहे. आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटामध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार खोडके या अजितदादांच्या पक्षात जाणार याची चर्चा होती. अखेर तो दिवस आला असून पुढील दोन दिवसांत खोडके यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. खोडके यांनी राष्ट्रवादीच्या अमरावतीतील जनसन्मान यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी केली असून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात आमदार खोडके यांचा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे.
आमदार खोडके यांना आगामी विधानसभेसाठी काँग्रेसकडून तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा होती. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांमध्ये खोडके यांचेही नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्या राष्ट्रवादीकडूनच निवडणूक इच्छूक होत्या. परंतु, ही जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढली आणि विजयी झाल्या. खोडके जरी काँग्रेसच्या आमदार असल्या, तरी सुरूवातीपासूनच त्यांची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक कधीही लपून राहिली नाही.