अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (यवतमाळ) : आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राजू तोडसाम यांचे घाटंजी शहरात गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार राजु तोडसाम यांची बुंदी तुला करण्यात आली. नंतर शहरात त्यांची विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीला हजारोंचा जनसागर स्वयंमस्फूर्तीने उसळला होता.
सदर रॅली तहसिल चौक ते गिलानी कॉलेज चौक, आंबेडकर वार्ड, छत्रपती शिवाजी चौक ते शहीद स्मारक, पोलीस स्टेशन चौक येथे समारोप व जाहीर आभार सभा घेण्यात आली. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना या आर्णी विधानसभेत झाला आणि जनशक्ती काय असते, याचा प्रत्यय शहराने अनुभवला आहे. रॅली दरम्यान शहरात जागोजागी लाडु तुला, साखर तुला करण्यात आला.
या आभार सभेला संबोधीत करतांना आमदार राजू तोडसाम म्हणाले कि, मतदार संघात उद्योग धंदे आणून ५ हजार युवकांच्या हाताला रोजगार देण्याचा निश्चय यावेळी त्यांनी केला. तसेच 2014 – 19 दरम्यान घाटंजीतील जिवन वाहीणी वाघाडी नदीला ९८५ कोटी मंजुर केले होते. परंतु नंतर हा निधी परत गेला. पुन्हा हा निधी परत आणून घाटंजी तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेताला सिंचन मिळेल यासाठी प्रयत्न करणार.
यावेळी घाटंजी येथे ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त व्हावा, अशी मागणी घाटंजी नगर परिषदेचे माजी सभापती सतिश मलकापुरे व भाजपा सरचिटणीस मनोज हामंद यांनी केली. याबाबत बोलताना आमदार राजू तोडसाम यांनी याकरीता १०० टक्के प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार राजू तोडसाम यांनी दिली.