यवतमाळ: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा अधिक आंदोलक आता आक्रमक होताना दिसत आहेत. मराठा आंदोलकांनी बीडच्या माजलगाव येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्यानंतर आता यवतमाळमधून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा आंदोलक आक्रमक झाले. मराठा आंदोलकांनी यावेळी प्रचंड गोंधळ घातला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना तातडीने ताब्यात घेतले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळमध्ये दाखल झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी जात होते. यावेळी काही मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर कार्यक्रम सुरु झाल्यानंतर कार्यक्रमामध्ये देखील गोंधळ घालण्यात आला. विशेष म्हणजे या गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील समावेश होता. या महिलांकडून राज्य सरकारवर सडकून टीका करण्यात आली. महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.