Maratha Reservation : सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस तुम्ही माझा बळी घ्या, पण खोटे आरोप सहन करणार नाही, तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.
माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, पण खोटो आरोप सहन करणार नाही. फडणवीस यावेळी तुमचा सुपडा साफ होणार. असंही मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरुच आहे. रविवारी जरांगेनी पत्रकार परिषदेत बोलताना जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अनेक आरोप केले आहेत.
मराठ्यांचा दरारा संपवण्याचं फडणवीसांचं लक्ष आहे. शिंदेंचे यामध्ये काही लोक असून अजित पवारांचेही दोन आमदार यामध्ये सामील आहेत. ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही, सगेसोयरेतून आरक्षण द्यायचं नाही, १० टक्के आरक्षण मराठ्यांवर लादायचं पण हे पोरगं ऐकतंच नाही. हे पोरगं संपलं पाहिजे, नाहीतर त्याचा गेम तरी करावा लागेल, नाहीतर याला बदनाम तरी करावा लागेल, याला उपोषणात तरी मरु द्यावं लागेल. याला सलाईनमधून विष देऊन तरी मारावं लागेल, असा यांचा विचार आहे. म्हणून मी सलाईन देखील बंद केली, असं म्हणत जरांगेंनी सरकारवर आरोप केले आहेत.
अजित पवार, छगन भुजबळ कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नाही, पण हे दोघे फडणवीसांच्या धाकाने भाजपात गेले. एकनाथ शिंदे कधीच शिवसेना सोडू शकत नव्हते, अशोक चव्हाण कधीच काँग्रेस सोडू शकत नव्हते, हे यांच्या धाकाने गेले. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात दरार निर्माण केली. एकदाच धनंजय मुंडे आवाज काढणार होता, त्याला आत टाकू का म्हटला, धनंजय गप्प बसला. ज्याने भाजप उभा केला, त्या गोपीनाथ मुंडेच्या मुलीची काय अवस्था केली. एकनाथ खडसे ज्याने भाजप उभी केली, त्याची काय अवस्था केली, अशा शब्दात जरांगेनी फडणवीस आणि भाजपवर टीका केला आहे.