अमरावती : एका महिलेला सोशल मीडियावरून प्रपोज करून किसिंग इमोजी पाठविण्यात आली. त्यांचा ऑनलाइन पाठलाग करण्यात आला. त्यांना खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. ही घटना शनिवार, २० जुलै रोजी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तिलक ठाकूर (रा. अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तक्रारीनुसार, १९ जुलै रोजी पहाटे पीडित महिला ही झोपेतून उठली. काही वेळाने त्यांनी मोबाइल बघितला. त्यावेळी त्यांना त्यांचा मित्र तिलक ठाकूर याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून त्यांच्या अकाउंटवर ‘आय लव्ह यू’ तसेच किसिंग इमोजी पाठविण्यात आल्याचे दिसून आले. आय लाइक यू, मैं तुमसे प्यार करता हु, असा मेसेजसुद्धा त्यांना दिसून आले. त्याचवेळी त्याने व्हाइस कॉलवर त्यांना उद्देशून गाणेदेखील म्हटले. तिलक ठाकूर याने पीडित महिलेला १९ जुलै रोजी पहाटे ३.४१ पासून रात्री १२ वाजेपर्यंत बरेच मेसेज पाठविले. २० जुलै रोजी सकाळी ७.१२ वाजेच्या सुमाराससुद्धा त्याने ‘गुड मॉर्निंग’ असा मेसेज त्यांना पाठविला.
मी तुमच्या रिप्लायची वाट पाहतो, असे म्हणून त्याने पीडित महिलेचा छुपा पाठलाग चालविला. त्याचवेळी त्याने पीडित महिलेला खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी दिली. मला सहकार्य कर, अशी धमकीसुद्धा त्याने त्यांना दिली. या प्रकाराने त्या घाबरल्या, त्यानंतर पीडित महिलेने स्वतःला सावरत राजापेठ ठाणे गाठून तक्रार दाखल केली.