यवतमाळ : उसनवार घेतलेले पैसे परत न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाने त्याच्या मित्रावरच रिव्हॉल्व्हर उगारली. ते पाहून घाबरलेला तो तरुण जिवाच्या आकांताने तेथून पळत सुटला. त्यानंतर त्याने थेट डायल ११२ वर कॉल करीत माहिती दिली. त्यावरून अवधूतवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच रिव्हॉल्व्हर जप्त केली. ही कारवाई सोमवारी (२ सप्टेंबर) दुपारी येथील जगतमंदिर परिसरात करण्यात आली.
ओंकार कानबा गाताडे (२१, रा. रविनगर, यवतमाळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचे दर्पण विजय भगत (२३, रा. नेहरूनगर, घाटंजी) या मित्राकडे उसनवार पैसे होते. मात्र अनेकदा पैसे परत मागूनही तो टाळाटाळ करीत होता. दरम्यान, सोमवारी दुपारी दर्पन आणि ओंकार दोघेही एकत्र आले. यावेळी त्यांच्यात पैसे परत करण्यावरून वाद झाला. त्यानंतर ओंकारने थेट जवळील रिव्हॉल्व्हर काढून दर्पणवर ती रोखली. रिव्हॉल्व्हर पाहून घाबरलेल्या दर्पणने क्षणाचाही विलंब न करता तेथून पळ काढला. त्यानंतर सुरक्षित ठिकाणी आडोसा घेत याची माहिती पोलिसांच्या डायल ११२ वर दिली. ही माहिती ऐकून अवधूतवाडी पोलिसांचे पथक थेट जगतमंदिर परिसरात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ओंकारला शिताफीने ताब्यात घेतले. तसेच रिव्हॉल्व्हरही जप्त केली. मात्र या कारवाईनंतर अल्पावधीतच पोलिसांचा हिरमोड झाला.
ओंकारवर धमकावल्याचा गुन्हा नोंद करून सोडून देण्यात आले. असे असले तरी या कारवाईत ठाणेदार नरेश रणधीर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, जमादार विशाल भगत, शिपायी रशीद शेख, कमलेश भोयर, प्रतीक नेवारे आदींनी सहभाग घेतला होता.
खोदा पहाड, निकला चूहाँ’
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून ओंकारला ताब्यात घेतले. शिवाय रिव्हॉल्व्हर जप्त करून त्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने ती रिव्हॉल्व्हरनसून हुबेहुब रिव्हॉल्व्हर दिसणारे लायटर असल्याचे पोलिसांना सांगितले. शिवाय हे लायटर ऑनलाइन खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी रिव्हॉल्व्हरचा खटका दाबून पाहिला. तेव्हा खरेच त्यातून आग बाहेर पडली. ते पाहून मात्र पोलिसांत एकच खसखस पिकली. त्यानंतर अनेकांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला.