कोरची (गडचिरोली): पतीच्या मोबाईलमध्ये प्रेयसी मुलीचा फोटो पत्नीला दिसल्याने तिने त्या मुलीच्या फोटोबद्दल पतीला हटकले असता त्याचा राग अनावर झाला. पत्नीकडून आपल्या प्रेमात अडथळा निर्माण होत असल्याचा राग मनात धरून घरात सोफ्यावर बसलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. ही घटना १ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास कोरची तालुका मुख्यालयापासून अंदाजे ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतरगाव येथे घडली. चमेली असे मृत पत्नीचे नाव असून आरोपी प्रदीप बालसिंग हारामी (३२) याची ती दुसरी पत्नी आहे. विशेष म्हणजे, आरोपी प्रदीपने यापूर्वी प्रेयसीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून खून केला होता.
घटनेच्या दिवशी १ एप्रिल रोजी आरोपी प्रदीप हारामी याचे आईवडील मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. घरी पती, पत्नी दोघेच होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चमेली बैठक खोलीतील सोफ्यावर बसली असताना तिचा गळा दाबून खून केला. खुनाचा संशय येऊ नये, म्हणून आरोपी प्रदीप लाकूड फाटे आणण्यासाठी घरातून पळून गेला. विशेष म्हणजे, आरोपी पतीला पत्नी चमेली आवडत नसल्याने तिचा राग करीत होता. घटनेचा उलगडा करण्यासाठी कोटगुल पोलिसांनी प्रदीप हारामीला विचारणा केली असता त्याने प्रथम पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिलीत.
दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखविल्याने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास कोटगुल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दयानंद नारायण शिंदे करीत आहेत.
यापूर्वीही आरोपीने केला होता खून
२०१९ मध्ये आरोपी प्रदीप हारामी याने भटगाव येथील रहिवासी पिलेश्वरी या मुलीची प्रेमसंबंधातून कुरखेडा येथे ब्लेडने गळा चिरून हत्या केली होती, आरोपी यापूर्वी कारागृहातून शिक्षा भोगून जामिनावर सुटून आला होता.