कोठारी (चंद्रपूर) : संशयावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास तालुक्यातील कुडेसावली येथे घडली. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी अंगणात विव्हळत असताना शेजाऱ्यांना आरोपीने धमकावित मदत करण्यास अटकाव केला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे, वंदना धनपाल रामटेके (६०) असे मृत महिलेचे नाव असून, धनपाल माधव रामटेके (७०) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी धनपाल रामटेके मागील अनेक दिवसांपासून कुडेसायली गावात अवैध दारुविक्रीचा व्यवसाय करीत होता. तो स्वभावाने तापट असून, त्याचे पत्नी व मुलांसोबत कधीच पटत नव्हते. मोठा मुलगा अमर आपल्या कुटुंबासह बाहेरगावी वास्तव्याला आहे. तर, लहान मुलगा पवन हा आईवडिलासोबत राहतो. धनपालचे पत्नी वंदनासोबत कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी खटके उडत होते. गुरुवारी सकाळी मुलगा पवन हा कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर धनपाल व वंदना यांच्यात संशयावरून वाद झाला. त्याचे पर्यावसान कडाक्याच्या भांडणात झाले.
यावेळी धनपालने घरातील चाकू आणून पत्नी वंदनावर सपासप वार केले. यात वंदना घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडली होती. शेजाऱ्यांनी त्याच्या घरासमोर जाऊन वंदनाला पाणी पाजण्यासाठी व उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धनपालने हातात चाकू घेऊन वंदनाच्या सभोवताल फिरून कुणीही तिला न्यायचे नाही. अन्यथा तुम्हालाही मारणार, असे धमकाविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शेजाऱ्यांनी कोठारी पोलिसांना कळविले. ठाणेदार योगेश खरसान, सचिन पोहनकर, जावेद सिद्दीकी, साईनाथ उपरे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून धनपाल यास ताब्यात घेतले व वंदनाला उपचारासाठी कोठारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. परंतु, वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने तिला बल्लारपूरकडे घेऊन जात असताना वाटेतच वंदनाने प्राण सोडले.
या घटनेची माहिती मुलगा अमर यास होताच त्याने कोठारी पोलिसांत तक्रार दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात करून तो कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. कोठारी पोलिसांनी घटनेची नोंद घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती होताच साहाय्यक पोलीस अधीक्षक रिना जनबंध, राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांनी भेट दिली. पुढील तपास कोठारीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश खरसान करीत आहेत.
प्राथमिक उपचार झाले असते, तर वाचली असती वंदना
वंदनाचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस तत्काळ कुडेसावलीत रवाना झाले. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या वंदनाला उपचारासाठी कोठारी आरोग्य केंद्रात सकाळी ९.३० वाजता आणले. मात्र, दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने प्राथमिक उपचार होऊ शकले नाहीत. तेथून चंद्रपूरला घेऊन जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचार मिळाले असते तर कदाचित वंदनाचा जीव वाचला असता.
न्यायवैद्यक पथक घटनास्थळी दाखल
वंदनाच्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी न्यायवैद्यक विज्ञान पथकाला पाचारण केले. पथकाने धनपाल याच्या घराची झडती घेत पुराव्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू व ठसे गोळा केले. ६० वर्षीय वंदना हिला काही महिन्यांआधी स्तनाचा कर्करोग झाला होता. तिला त्यापासून वाचविण्यासाठी मुलांनी बरेच प्रयत्न केले होते. वंदना कर्करोगातून नुकतीच बरी झाली होती. आपल्या मोठ्या मुलाजवळ राहून ती कर्करोगाशी संघर्ष करून दोन महिन्यापूर्वीच कुडेसावली येथे राहायला आली होती. कर्करोगातून बचावली. मात्र, पतीच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडून तिला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व धनपालच्या या कृत्याबाबत संत्ताप व्यक्त करण्यात येत आहे.