हिंगणा : तान्हा पोळ्याच्या दिवशी दारू पिल्यानंतर मोठ्या भावाने भांडण करून लहान भावाला व त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या लहान भावाने मोठ्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना हिंगणा तालुक्यातील मांडव घोराड येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून लहान भावास अटक केली आहे. किसन विनायक चौखे (३६), असे मृतकाचे तर गोविंदा विनायक चौखे (२७), असे आरोपीचे नाव आहे.
दोन्ही भाऊ आणि त्यांचे आईवडील एकत्र राहात होते. किसन चौखे हा शेतमजुरी करायचा. किसनला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी काही वर्षांपूर्वी सोडून गेली होती. त्याला नयन (९) नामक मुलगा आहे. तो आजीआजोबा सोबत राहतो. २ सप्टेंबर रोजी तान्हा पोळ्याच्या दिवशी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गोविंदा चौखे हा कामावरून परत आला. काही वेळानंतर किसन चौखे हा दारू पिऊन घरी आला आणि त्याने लहान भावाशी भांडण केले. भांडणादरम्यान किसनने गोविंदाच्या पत्नीलाही शिवीगाळ केली. यामुळे संतापलेल्या लहान भावाने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण मोठ्याला केली. मारहाणीनंतर किसन चौखे रस्त्यावर पडून होता. मांडव घोराड ग्रामस्थांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यानंतर किसन याला हिंगणा ग्रामीण रुग्णालयात आणले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग जाधव ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. शवविच्छेदनाचा अहवाल आणि आई प्रभा विनायक चौखे यांच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून गोविंदाला अटक केली. ४ सप्टेंबर रोजी त्याला न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसांचा पीसीआर देण्यात आला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार प्रशांत ठवरे करीत आहे.