नागपूर: प्रेयसीने पहिल्या प्रियकराचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून पोलिसांनी प्रेयसी व दुसऱ्या प्रियकराला अटक केली आहे. नीलू (रा. झेंडा चौक, तकिया) आणि राहुल रमेश गायकवाड (रा. न्यू गांधी ले-आउट, गोदावरीनगर), अशी अटक करण्यात आलेल्या प्रेमीयुगुलांची नावे आहेत. तर संतोष मनोहर चुन्ने (रा. तकिया, धंतोली), असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
विवाहित असलेल्या प्रेयसीचे प्रियकराच्या मित्राशीच सूत जुळले. त्यामुळे तिने पहिल्या प्रियकराशी दुरावा निर्माण केला. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीला मारहाण करून मित्रापासून दूर राहण्यास बजावले. परंतु प्रेयसी आणि दुसऱ्या प्रियकराने कट रचून पहिल्या प्रियकराचा गळा चिरून खून केला. त्याचा मृतदेह जंगलात फेकून पळ काढला. या खून प्रकरणात पोलिसांनी प्रेमीयुगुलांचा छडा लावून अटक केली.
संतोष चुन्ने हा ई-रिक्षाचालक आहे. त्याच्या पत्नीचे मागील तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. एकाकी पडलेल्या संतोषची वस्तीत राहणाऱ्या नीलूशी ओळख झाली. अनेकदा नीलू त्याला जेवायला देत होती. या ओळखीतून दोघांचे सूत जुळले. नीलू विवाहित असून तिच्या पतीचे चहाचे दुकान आहे. तो सकाळी सहा वाजता जातो आणि रात्री अकरा वाजता परततो. ही बाब हेरून संतोष नीलूच्या घरी जायला लागला. एकमेकांच्या संपर्कात राहत असल्यामुळे दोघांचे अनैतिक संबंध जुळले. पती, घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघेही घराबाहेर पडत होते.
अनेकदा नीलू ही संतोषच्या घरी जात होती. दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण तिच्या पतीला लागली. त्यामुळे त्याने नीलूला मारहाण केली आणि संतोषपासून दूर राहण्यास बजावले. त्यामुळे संतापलेल्या संतोषने नीलूच्या पतीला घरी जाऊन मारहाण केली. यानंतर माझ्या प्रेयसीला मारहाण केल्यास जिवे मारू, अशी धमकी दिली. तेव्हापासून संतोष आणि नीलू उजळ माथ्याने पतीच्या विरोधाला झुगारून अनैतिक संबंध ठेवत होते. यादरम्यान, संतोषचा मित्र राहुल गायकवाड याची नजर नीलूवर पडली. मित्राला दगा देऊन त्याने नीलूशी मैत्री केली. राहुलने संतोषला माहिती न होऊ देता नीलूशी प्रेमसंबंध वाढविले. नीलू ही पती आणि पहिला प्रियकर संतोषच्या चोरून राहुलला भेटायला जात होती. दोघांचेही प्रेमसंबंध वाढले. प्रेयसीचे मित्र राहुलशी सूत जुळल्याची कुणकुण संतोषला लागली. त्याने पाळत ठेवली आणि दोघांनाही नको त्या अवस्थेत पकडले. त्यामुळे त्याने नीलू आणि राहुलला मारहाण केली.
नीलू व राहुलने काढला काटा
नीलू आणि राहुल यांनी संतोषचा काटा काढण्याचा कट रचला. रविवारी दुपारी नीलूने संतोषला जंगलात फिरायला नेण्यास सागितले. दोघेही ई-रिक्षाने बुटीबोरीजवळील मोहगाव परिसरात गेले. संतोषला नीलूने दारू पाजली. त्यानंतर तिने राहुलला कॉल करून बोलावून घेतले. दोघांनी मिळून संतोषचा गळा चिरला. त्याचा मृतदेह जंगलात फेकून दोघेही दुचाकीने नागपुरात परतले.
मोबाइल सीडीआरवरून लागला सुगावा
संतोषचा मृतदेह पाण्याने खराब होऊन मृतदेहाची ओळख पटणार नाही, अशा तोऱ्यात नीलू आणि राहुल होते. तर दुसरीकडे ई-रिक्षाच्या क्रमांकावरून संतोषची ओळख पटवून त्याच्या मोबाइलचा सीडीआर काढला. त्यात शेवटचा फोन नीलूला केल्याचे लक्षात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे आणि पथकाने नीलूला खाक्या दाखविताच तिने खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी नीलू आणि प्रियकर राहुल गायकवाडला अटक केली.