भंडारा : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेला निर्जनस्थळी नेले. रस्त्यातच दुचाकी थांबवून हातात दगड घेऊन तिला अंगावरील दागिणे व साहित्य देण्यास सांगितले. या घटनेने संबंधित महिला चांगलीच घाबरली होती. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपीला अवघ्या 12 तासांत अटक केली.
पन्नालाल गोमाजी वाळवे (वय 35, रा. पालोरा ता. पारशिवनी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी महिला सुनंदा रवींद्र वासनिक (52) या खुटसावरी फाट्याजवळ उभ्या असताना एकाला खुटसावरीपर्यंत लिफ्ट मागितली. त्याच्या दुचाकीवर बसून खुटसावरी गावाच्या रोडने घेऊन जात असताना रस्ता सुनसान पाहून त्याने दुचाकी झुडपी जंगलाच्या रस्त्याने वळवली. तेव्हा सुनंदा वासनिक या चालत्या गाडीवरून खाली उतरल्या.
त्यावेळी पन्नालालने दुचाकी थांबवून हातात दगड घेऊन तिला अंगावरील दागिणे व साहित्य देण्यास सांगितले. साहित्य दिले नाही तर ठार मारेन, अशी धमकी देत गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत, खडा व मोबाईल असा 17 हजारांचा ऐवज हिसकावून पळून गेला.
दरम्यान, या प्रकरणाची तक्रार महिलेने लाखनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे व गोपनीय सूत्रांकडून आरोपी पन्नालाल गोमाजी वाळवे याला लाखनी येथून ताब्यात घेतले.