कोंढाळी (नागपूर): स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे सहा ते सात अज्ञात आरोपींनी बुधवारी (७ ऑगस्ट) मध्यरात्री किराणा दुकानाचे कुलूप तोडून दुकानातील चिल्लर रक्कम चोरली, आवाज ऐकून दुकानदाराला जाग आली असता आरोपींनी त्यांच्या पोटाला चाकू लावून जिवे मारण्याची धमकी दिली. दोन कोटी रुपये कुठे ठेवले आहे, अशी विचारणा केली. प्रतिकार केला असता त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची दीड लाखाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिभाऊ दुधे यांचे बाजारगाव येथे घर व किराणा मालाचे दुकान आहे. घटनेच्या रात्री सहा ते सात जणांनी तोंडाला कापड बांधून किराण्याचे शटर तोडून चिल्लर चोरली. त्यानंतर सर्व चोरट्यांनी अरुण यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडले व घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा उघडल्याचा आवाज येताच किराणा व्यापारी अरुण दुधे हे त्यांच्या खोलीतून बाहेर आले. ते बाहेर येताच एकाच्या हातात हातोडा, दुसऱ्याच्या हातात रॉड आणि तिसऱ्याच्या हातात चाकू असल्याचे त्यांनी बघितले. एकाने दुधे यांच्या पोटाला चाकू लावून दोन कोटी कुठे ठेवले? अशी विचारणा केली. माझ्याकडे पैसे नाही, असे अरुण यांनी सांगताच एका चोरट्याने त्यांच्यावर हातोड्याने प्रहार केला. ते जखमी झाले.
या आरडाओरडीत अरुण यांचा मुलगा मयूर खोलीतून बाहेर आला. वडिलांना जीवघेणी मारहाण होत असल्याचे दिसताच त्याने घरातील बकेट चोरट्यांना फेकून मारली व जोरजोरात ओरडू लागला. चोरट्यांनी प्रतिकार होत असल्याचे बघुन दुधे यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची चेन हिसकावून चारचाकी वाहनातून पळ काढला. घटनेची माहिती फिर्यादीने कोंढाळी पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राजकुमार त्रिपाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र श्वानपथक माग घेऊ शकले नाही, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी करीत आहेत.