मारेगाव (यवतमाळ): पीएम खात्याची लिंक ओपन करताच शेतकरी तथा मेडिकल व्यावसायिक असलेल्या एका व्यक्तीच्या खात्यातून एकूण २० हजार रुपये काढून घेण्यात आले. ही घटना २१ सप्टेंबरला दुपारी तालुक्यातील माडी येथे उघडकीस आली. या घटनेने ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अतुल देविदास बोबडे (रा. मार्डी) पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी १९ सप्टेंबरला दुपारी पीएम किसान खात्याची लिंक ओपन केली होती. ही लिंक ओपन करताच त्याचा मोबाईल बंद पडला. कव्हरेजची अडचण असेल, असे वाटल्याने ते २१ सप्टेंबरला मारेगाव येथे सिम कार्ड चेंज करण्यासाठी आले. नवीन सिम कार्ड घेतल्यानंतर २४ तासांनी संदेश येणे सुरू झाले. त्यामध्ये २० सप्टेंबरला मारेगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतील खात्यातून पाच हजार रुपये, एचडीएफसीतून एक हजार १०० तर अन्य व्यवहाराद्वारे १२ हजार २६३ रुपये काढून घेतल्याचे पुढे आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी फोन पे, गुगल पे आणि व्हॉटस्अॅप असे सर्वकाही ब्लॉक केले. तरीही ओटीपी येणे सुरूच होते. त्यानंतर त्यांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिकर्त्याच्याही फसवणुकीचा प्रयत्न
एका स्थानिक अभिकर्त्याला काही दिवसांपूर्वी मुंबईवरून एक कॉल आला. यावेळी समोरील भामट्याने तुमच्या मुलाची दुचाकी जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच त्याची सुटका करायची असेल, तर तातडीने दिलेल्या क्रमांकावर ऑनलाइन २५ हजार रुपये पाठविण्यास सांगितले, ते ऐकून घाबरलेल्या अभिकर्त्याने २५ हजार रुपयांची जुळवाजुळव केली. मात्र, पैसे टाकण्यापूर्वी एकदा मुलाशी बोलून घ्या, असा सल्ला एका मित्राने दिला. त्यावरून त्यांनी मुलाला कॉल केला, तेव्हा अशी कुठलीही अटक झाली नसल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे अभिकर्त्यांची फसवणूक टळली होती.