हिंगणा (नागपूर): आई जन्म देते, सांभाळ करते, प्रेम देते, सांभाळून घेते, पण खऱ्या अर्थाने जगणे शिकवितो तो बाप. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या, बाईट वळणावर मुलांचे भले व्हावे महणून खस्ता खातो तो बाप. मुलांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो तो बाप. पण एमआयडीसीतील एका वासनांध बापाने बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारे कृत्य केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ५ वर्षांच्या स्वतःच्या मुलीशी अश्लील चाळे करताना पत्नीने त्याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
बुधवार, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पीडित मुलीची आई घराच्या मागच्या रूममध्ये भांडे घासत होती आणि आरोपी बाप त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीसोबत समोरच्या रूममध्ये होता. अचानक मुलीच्या आईला मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. ती लगेच हातचे काम सोडून समोरच्या रूममध्ये धावत आली असता तिला मुलगी रडताना आणि तिचे कपडे कंबरेपर्यंत सरकलेले दिसले.
आरोपी बाप हा तिच्या कंबरेवरून हात फिरवत असल्याचे दिसले. तिने लगेच मुलीला आरोपी बापापासून जवळ घेतले. त्याला ‘असे का करत आहे?’ असा पीडित मुलीच्या आईने प्रश्न केला असता त्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर बुधवारी रात्री पीडित मुलीची आई तिला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांना घडलेला प्रकार सांगितला. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करून गुरुवारी दुपारी अटक केली.