बल्लारपूर (चंद्रपूर): शहरातील एका दुकानदाराची शेती विकण्याच्या बहाण्याने २० लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बल्लारपुरातील बालाजी वॉर्डातील शशांक सत्यनारायण कोत्ताकोंडा यांनी मौलाना आझाद वॉर्डातील विजय नत्थूजी कोंडेकर व राजू नत्थूजी कोंडेकर यांच्यासोबत राजुरा तालुक्यातील कढोली येथील हिस्से वाटपाची तीन एकर शेती घेण्याचा सौदा ३५ लाखांत केला होता. शशांक कोत्ताकोंडा यांनी कोंडेकर बंधूंना २० लाख ५० हजार रुपये नगदी दिले व जमीन आपल्या ताब्यात घेतली होती. उर्वरित रक्कम विक्रीपत्र करण्याच्या दिवशी देण्याचे ठरले होते.
यातच शशांक कोत्ताकोंडा यांनी शेतीचे ऑनलाइन फेरफार तपासले असता ही शेती अन्य दोघांना विकली असल्याचे निर्दशनास आले. त्यांचे नाव फेरफार झाल्याचे दिसल्याने फसगत झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच कोंडेकर बंधूशी संपर्क साधला. यावेळी त्यांना विचारणा केली असता, जमिनीचा ताबा सोडून दे व तुला काय करायचे ते करून घे, अशी धमकी त्यांनी दिली. शशांक कोत्ताकोंडा यांनी फसवणूक झाल्याने विजय कोंडेकर व राजू कोंडेकर यांच्याविरोधात बल्लारपूर पोलिसांत तक्रार केली. बल्लारपूर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२० (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.