नागभीड (चंद्रपूर): नागभीड तालुक्यातील चिंधीमाल जवळील घोडाझरी जंगल परिसरात २२ जूनला पतीने तीन मित्राच्या साहाय्याने पत्नीचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. पत्नी बेशुद्ध झाल्यावर मृत झाल्याचे समजून आरोपी पसार झाले होते. दरम्यान, नागभीड पोलिसांनी रविवारी आरोपी पतीस गोंदिया येथून अटक केली. या घटनेत सहभागी आरोपीचे तीन मित्र अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विसोरा येथील कार्तिक नाकाडे (२८) याने चंद्रपूर येथे माहेरी गेलेल्या पत्नीला गावाकडे परत नेत असताना घोडाझरी जंगल परिसरात शौचास जाण्याचा बहाणा करीत दुचाकी थांबविली. यानंतर त्याने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने पत्नीचा खून करण्यासाठी जंगलात नेवून गळा आवळला.
काही वेळात पत्नी बेशुद्ध झाल्यावर ती मृत झाली समजून तिला जवळच असलेल्या पाइपमध्ये टाकून आरोपी पसार झाले होते. दरम्यान, काही वेळाने पत्नीला शुद्ध आली व जंगलातून ती नागभीड-तळोधी मार्गावर आली. तेथून ती चिंधीचक गावात पोहचून गावकऱ्यांना आपबिती सांगितली. गावकऱ्यांनी घटनेची माहिती लगेच नागभीड पोलीस ठाण्याला दिली. घटनास्थळावर पोलीस पोहोचून पीडित महिलेचा जबाब नोंदविला व तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. यानंतर पोलीस फरार आरोपीच्या शोधात असताना आरोपी पती कार्तिक नाकाडे यास गोंदिया जिल्ह्यातून अटक केली. आरोपीवर भादंवि ३०७, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली आहे. न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी दिली आहे.