नागपूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये महिलेसोबत राहत असताना तिचा साडेचार वर्षांचा मुलगा लग्नात अडसर वाटू लागला. त्यामुळे प्रियकराने त्या मुलाला शाळेमध्ये नाव टाकण्याच्या बहाण्याने घरून नेले आणि थेट वर्ध्याकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये नेऊन सोडून दिले. दरम्यान गणेशपेठ पोलीस आणि गुन्हे शाखा पोलिसांनी या मुलाला सुखरुप नागपुरात आणून आरोपी प्रियकराला गजाआड केले. आरोपी हंसराज ज्ञानेश्वर दखने (२५, रा. पोरा, ता. लाखनी, जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गणेशपेठ हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचे पतीसोबत पटत नसल्यामुळे ती पतीपासून विभक्त राहते. तिला साडेचार वर्षांचा मुलगा आहे. महिनाभरापूर्वी महिलेची आरोपी हंसराजसोबत ओळख झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यामुळे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. आरोपीने महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, महिलेने आपल्या मुलासह स्वीकार करण्याची अट घातली. लग्नात साडेचार वर्षांचा मुलगा आरोपीला अडसर वाटू लागला. त्याने मुलापासून सुटका करून घेण्याचा प्लॅन आखला. आरोपीने शुक्रवार २१ जूनला दुपारी ३ वाजता मुलाला सोबत घेतले आणि त्याचा शाळेत प्रवेश करून येतो, असे महिलेस सांगितले.
काही वेळानंतर आरोपी हंसराज घरी एकटाच परतला. त्यामुळे महिलेने मुलगा कुठे आहे? अशी विचारणा केली. आरोपीने तिला खापरी येथील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलजवळील सिटी बसस्टॉप येथे अज्ञात ३ आरोपींनी मुलाला पळवून नेल्याचे सांगितले. त्यातील एका व्यक्तीला या मुलाने पप्पा असे म्हटल्याचे त्याने सांगितले. त्यावर महिलेने आपल्या पूर्वीच्या पतीला फोन करून विचारणा केली असता, त्याने आपण मुलाचे अपहरण केले नसल्याचे सांगून पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.
महिलेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपी हंसराजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. आरोपीने नागपूर रेल्वेस्थानकावरून या मुलाला दुपारी ३ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर वर्ध्याकडे जाणाऱ्या रेल्वेत वसवून दिल्याचे सांगितले. गणेशपेठ पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्वरित दखल घेऊन मुलाला वर्धा येथून सुखरूप नागपुरात आणले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी हंसराजविरुद्ध कलम ३१७, ३६३, १८२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.