चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे उमेदवार देवराव भोंगळे यांनी मतदारांना आमिष देण्यासाठी ६१ लाखांची रोकड लपवून ठेवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने रात्री उशिरा गडचांदूर येथील एका संशयित घरावर धाड टाकत ही रक्कम जप्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुरा विधानसभा प्रमुख अरुण निमजे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली. प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, संपूर्ण विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात बाहेरील महिला, पुरुष आणि बाऊंसर नेमून मतदारांना पैसे वाटप करण्याचा कट रचला जात असल्याचे उघडकीस आले. निवडणूक आयोगाच्या टीमने रात्रभर तपास करून संबंधित मोठी कारवाई केली. जप्त करण्यात आलेली रक्कम निवडणूक आयोगाच्या ताब्यात देण्यात आली आहे.