नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनाकडे विदर्भातील जनतेचे विशेष लक्ष लागलेले असते. संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून आपली कामे व मागण्यांची पूर्तता करण्याची अपेक्षा यानिमित्ताने वाढलेली असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे व पर्यायाने विदर्भाचे असल्याने विदर्भवासीयांच्या त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. तसेच नागपुरातच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत विदर्भातील सात मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे विदर्भवासीयांच्या आशादेखील पल्लवित झाल्या आहेत. मात्र मंत्र्यांना खातेवाटपच झाले नसल्याने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेमके जावे कुणाकडे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विदर्भाप्रमाणेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अभ्यागतांवरदेखील मंत्र्यांना खातेवाटप झाले नसल्याने विधानभवन परिसरात नुसतीच भटकंती करण्याची वेळ आली आहे.
नवीन मंत्र्यांना खातेवाटपच झाले नसल्याने कामानिमित्त बाहेरगावावरून आलेल्यांना फक्त एकमेकांची तोंडे पाहण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. त्यामुळे विधानभवन परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अभ्यागतांवर कागदपत्रे घेऊन इकडून तिकडे फिरण्याची वेळ आली आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले व मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यात ३३ कैबिनेट व सहा राज्यमंत्री अशा ३९ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी १६ डिसेंबरपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. त्यामुळे प्रलंबित समस्या, मागण्या, तक्रारी किंवा काही कामानिमित्त बाहेरगावावरून आलेल्यांना नेमके कोणत्या मंत्र्याकडे जावे? हा प्रश्न पडला आहे. मंत्र्यांचा शपथविधी झाला; पण पुढे काय? हा प्रश्न कायम आहे. समस्या, मागण्या, तक्रारी कोणासमोर मांडायच्या किंवा काम कोणाकडून करून घ्यायचे? हेच स्पष्ट नसल्याने सर्वजण कागदपत्रे घेऊन विधानभवनाच्या आवारात फिरत आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात नागरिकांची तोबा गर्दी दिसत आहे. जर खातेवाटप झाले असते तर येणे सार्थक झाले असते, असे अनेकजण उघडपणे बोलून दाखवीत आहेत.
बुधवारी (ता.१८) हिवाळी अधिवेशन २०२४चा तिसरा दिवस संपला, तरी कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या फक्त त्यांच्या कक्षाबाहेर झळकू लागल्या आहेत. त्यावर केवळ मंत्री असा उल्लेख आहे. खातेवाटप झाले नसल्याने कोणत्या मंत्र्यांना कोणते निवेदन द्यावे, याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. तरी बाहेरगावावरून आलेले अभ्यागत आपापल्या गावच्या आमदार, मंत्र्याला भेटून त्यांचे पुष्पगुच्छ घेऊन अभिनंदन करून कानावर गाऱ्हाणी टाकून परतीचा रस्ता धरताना दिसत आहेत.