नागपूर : फेसबुकवरील जाहिरातीचे आमिष एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस लाभ देण्याचे आमिष दाखवून त्या वयोवृद्धाची अडीच कोटींची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी वयोवृद्धाने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
अधिक नफ्याचं आमिष भोवलं
नागपुरातील रामदास पेठ येथील रहिवासी फिर्यादी मोती दुलारामानी (78) यांचा खाद्यपदार्थांना सुगंध येण्यासाठी वापरण्यात येणारे पावडर आणि केमिकलचा व्यवसाय होता. वयोवृद्ध झाल्याने त्यांनी व्यवसायातून निवृत्ती घेतली होती. एकदा दुलारामानी मोबाईल हाताळत असताना फेसबूकवर एक जाहिरात पाहिली. ज्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 15 ते 20 टक्के नफा मिळवून दिला जाईल, असे सांगण्यात आले होते.
यावर विश्वास ठेवत दुलारामानी यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला. त्यानंतर संशयित आरोपीने एक लिंक पाठविली तसेच स्टॉक फ्रंटलाईन या व्हॉट्सअॅप ग्रुपला देखील त्यांना जोडून घेतले. या ग्रुपमधील इतर सदस्य त्यांना लाखांमध्ये लाभ झाल्याचा मेसेज टाकत होते. हा प्रकार पाहून दुलारामानी मोहात पडले आणि त्यांना या जाहिरातीवर विश्वास बसला.
दुलारामानी आपल्या जाळ्यात फसल्याचे लक्षात आल्या नंतर त्यांना डीमॅट अकाऊंट उघडायला सांगितले. दुलारामानीही डीमॅट अकाऊंट उघडले. संशयिताने त्यांना बनावट लिंक पाठवत शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने 11 नोव्हेंबर 2023 ते 8 जानेवारी 2024 या कालावधीत 2 कोटी 75 लाख रुपये वळते केले. विश्वास संपादन करण्यासाठी संशयिताने दुलारामानी यांना 26 लाख 31 हजार रुपयांचा लाभ दिला.
तसेच लाखात लाभ मिळाल्याचे दुलारामानी यांनाऑनलाईन दिसत होते. त्यांनी उर्वरित रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, डीमॅट अकाऊंट रिचार्ज करावे लागेल, असे संशयिताकडून सांगण्यात आले. त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून त्यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.