नागपूर : बाहेरील व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. राखी उर्फ पूनम पाटील (वय-२७) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर सूरज पाटील असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सूरज आणि राखीने तुळजाईनगरात भाड्याने खोली घेतली होती. सूरज पेंटींगचे काम करतो. त्यांना पाच आणि तीन वर्षाच्या दोन मुली आहेत. गुरूवारी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. रागात सूरजने राखीला डोक्यात मारले. व तिचे डोके भिंतीवर मारले. त्यामुळे राखी रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली.
घरात रक्ताचा सडा पडला. पाहता पाहता राखी बेशुध्द झाली. दुपारी ३ वाजताच्या सुमारास सूरज राखीला मेडिकल रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी राखीला मृत घोषित केले. पत्नी इमारतीवरून खाली पडल्याने डोक्याला जबर लागल्याचे सूरजने डॉक्टरांना सांगितले. घटनेनंतर सूरज दोन्ही मुलींना घेऊन फरार झाला. घरमालकासह जवळपासच्या लोकांनाही त्याच्याबाबत माहिती नव्हती.
पोलिसांनी पाहणी केली असता घरात रक्ताचा सडा पडून होता. ठाणेदार भेदोडकर यांनी सूरजला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस अंमलदाराच्या माध्यमातून त्याला फोन केला. मेडीकलच्या कागदपत्रावर तुझी स्वाक्षरी पाहिजे. हे कागदपत्र भविष्यासाठी महत्वाचे आहे. स्वाक्षरी करून कागदपत्र घेऊन जा, असे सांगताच सूरज रुग्णालयात पोहोचला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. राखीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला.