अमरावती : अमरावतीच्या अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आला आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो.
मात्र, प्रकार समोर येताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. दरम्यान, शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. .
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षण विभागाच्या आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. यामधील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र, त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारला आणि ते चॉकलेट परत केले .
तर असाच एक प्रकार पंढरपुरात देखील घडला होता. यामध्ये चक्क पोषण आहारात मृत बेडूक आढळले होते. कासेगावच्या भुसेनगर येथील हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यामुळे सातत्याने घडत असलेल्या या घटना लक्षात घेता पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला की काय? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.