अमरावती : अमरावती जिल्ह्यातून अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीने बँकेतून पाच हजार रुपये काढल्याने मित्रासमोर पत्नीने पतीला मारले. हाच राग मनात धरत पतीने पत्नींची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. ही घटना अमरावती जिल्ह्यातील एकलविहीर येथे घडली आहे. पती शालिग्राम धुर्वे याला वरुड पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
आरोपी शालीकराम धुर्वे हा गावातील गुरे चराईचे काम करतो. त्यातून मिळणारे सगळे पैसे तो त्याची पत्नीकडे द्यायचा. आरोपी शालिकरामला ५० रुपये हवे असले तरीही तो पत्नीलाच मागायचा. त्यामुळे पत्नी नीला धुर्वे ही आपल्या पतीला वारंवार अपमानित करत असायची. याच कारणामुळे शालिग्रामने परस्पर बँकेतून ५ हजार रुपये काढले. मात्र, ही बाब नीला धुर्वे हिला समजताच ती भडकली. यानंतर पत्नी नीला धुर्वे हिने पती शालिकराम धुर्वे याला मित्रासमोरच मारून अपमानित केले.
पत्नीने मित्रासमोरच मारल्याने पतीला राग आला. याच रागातून आरोपी शालिकराम धुर्वे यानी पत्नीचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने तिचा मृतदेह जंगलात फेकला. त्यानंतर तिचा पती गावात आला आणि पत्नीला शोधायचे नाटक केले. पोलिसांनी आरोपी पतीला विचारपूस करण्यासाठी बोलावले. आरोपी शालिग्राम धुर्वे याने पोलिसांना सुरूवातीला उडवा उडवीचे उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांनी कसून चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपी पती शालिग्राम धुर्वे याला वरुड पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.