गोंदिया : जिल्ह्यातील अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. बोपचे यांनी आज यांनी मुबंईत शरद पवार यांची भेट घेत त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार राजेश टोपे यांचीही उपस्थिती होती.
महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणाचे? यावर निवडणूक आयोगात लढाई सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटासोबत राहिलेले माजी खासदार आणि राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे अध्यक्ष खुशालचंद्र बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुबंईत घेतली. या भेटीनंतर त्यांनी पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. युवा नेते रविकांत बोपचे यांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
बोपचे पितापुत्रांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यामुळे गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांना पुन्हा हादरा बसला आहे. दोन दिवसांपूर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पटेल गटाला धक्का दिला होता.