-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे व यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पांढरकवडा, येथील विभागीय अध्यक्ष व संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आशिष सुरेशराव लोणकर यांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम 1963 च्या कलम 17 अन्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांनी संचालक पदावरून काढून टाकण्याचे आदेश पारित केले होते.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजू ॲड. मंगेश गंगलवार (यवतमाळ) यांनी मांडली. तर उपसभापती सचिन देशमुख पारवेकर व इतर संचालकांकडून ॲड. सोनाली लाडेकर (गंगलवार) यांनी वकील पत्र दाखल केले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन संचालक अपात्र प्रकरणात घाटंजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांनी सदर आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान याचिका दाखल केली. सदर प्रकरणात युक्तिवाद होऊन पुढील आदेशापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात येऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती नितीन बोरकर यांनी दिला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. सदर प्रकरणात 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत जैसे थे चे आदेश नियमित करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयात दाखल प्रकरणात याचिकाकर्ते संचालक अभिषेक ठाकरे, संचालक आशिष लोणकर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. वाय. एन. सांबरे यांनी युक्तिवाद केला. तर कॅव्हेटर म्हणून वरिष्ठ वकील ॲड. कप्तान, ॲड. आर. व्ही. गहीलोत यांनी बाजू मांडली. तर सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड. जोशी यांनी काम पाहिले.