बुलढाणा : राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अशातच जळगाव जामोज मतदारसंघातील जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर हे आपल्या सहकाऱ्यासमवेत असताना आज पहाटे पाच वाजता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांना अकोला येथे उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. डिक्कर समर्थकांकडून हा हल्ला भाजपच्या गुंडानी केला असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशांत डिक्कर हे आज सकाळी मतदानाच्या निमित्ताने बूथ पाहणी करीता शेगावकडे येण्यास निघाले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात प्रशांत डिक्कर व त्यांचे सहकारी चालक गंभीर जखमी झाले. याचवेळी प्रशांत डिक्कर यांनी हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहे.
दरम्यान, लोकशाही पद्धतीने आपला पराभव दिसत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या स्थानिक आमदाराने हा भ्याड हल्ला घडवून आणलेला आहे. हा माज आम्ही उतरवू. प्रस्थापितांना या उमेदवाराची भीती वाटत असल्याने हा हल्ला झाला असल्याची प्रतिक्रिया स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आहे.